फलटण चौफेर दि १ नोव्हेंबर २०२५
फलटण शहर व तालुक्यातील राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांना आता पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट प्रसिद्ध करताना नव्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. पत्रकार संघटनेने जारी केलेल्या या नियमावलीनुसार, माध्यमांशी अधिकृत संपर्क फक्त पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फतच साधता येणार आहे.पत्रकारिता कार्यात पारदर्शकता आणि जबाबदारी आणण्यासाठी ही आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नव्या नियमावलीनुसार, कोणत्याही पत्रकार परिषद किंवा प्रेस नोट आयोजनापूर्वी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आगाऊ माहिती देणे बंधनकारक राहील. माहिती देताना सत्यता, संयम आणि जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच, संबंधित बातमी प्रसिद्ध करण्याचा अधिकार त्या त्या वृत्तपत्रांनाच राहील, अशी तरतूद करण्यात आली आहे. अनधिकृत व्यक्तींनी किंवा नोंदणीकृत माध्यमांच्या बाहेरील घटकांनी माहिती प्रसिद्ध करू नये, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.पत्रकार आणि सामाजिक तसेच राजकीय संघटनांमधील सुसंवाद व विश्वास टिकवण्यासाठी ही नियमावली उपयुक्त ठरणार असल्याचे मत संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.पत्रकार परिषदेसंदर्भात अधिक माहितीसाठी यशवंत खलाटे-पाटील (मो. 9421213656, 9822973344) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


